दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे अवैध गावठी दारू वाहतुक करणाऱ्या वाहनांवर दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत मोठी कारवाई केली आहे . ही माहिती दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.
दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२८) गस्त घालत असताना दौंड तालुक्यातील पांढरेवाडी – एमआयडीसी परिसरात बेकायदा गावठी दारूची विक्री करणाऱ्यासाठी वाहन येणार असल्याची माहिती मिळाल्याने दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे यांनी पथकासह रविवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत नाकाबंदी केली.
यावेळी या पथकाने एक पिकअप गाडी थांबवुन तपासणी केली असता 20 प्लास्टिक 35 लिटर क्षमतेच्या डपकी मध्ये एकुण 700 लिटर गावठी दारू व पिकअप सह एकूण 5 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अर्जुन बिरबल राठोड व जितेय शिवा राठोड ( दोघेही रा. पांढरेवाडी ता .दौंड जि पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात दारू बंदी अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक चरणसिंग राजपुत , उप अधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे, उपनिरीक्षक मांजरे, सहायक फौजदार दत्ता गवारे, जवान केशव वामने, नवनाथ पडवळ, चंद्रकांत इंगळे, अशोक पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस विजय रोकडे करीत आहेत.











