राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार ईडी आणि सीबीआय यांचा गैरवापर करत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील शरद पवार यांना संपवण्याची भाषा करीत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार दर द्यावा आणि कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी संसदेत मागणी केली तर आमचे निलंबन केले. आमचा पक्ष फोडला, पक्षाचे चिन्ह ही हिसकावून घेतले आणखी काय करायचे ते करा मी मोडेल पण दिल्ली समोर वाकणार नाही. अशा शब्दात महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला.
बारामतीत शुक्रवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि शनिवारी (दि २०) सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी सुळे यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला शेतकरी यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे उपस्थित मतदाराची संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.
त्या म्हणाल्या की, मागील दहा वर्षात भाजप सरकारने कोणतेही ठोस असे काम केले नाही. मात्र महागाई भरमसाठ वाढवली आहे, बेरोजगारी युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अजून दहा वर्षात शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस , दूध आणि इतर शेतपिकांना योग्य बाजार दर दिला गेला नाही. आता दोन महिन्यानंतर वीज दरांमध्ये ही भरमसाठ वाढ करणार आहे.
दौंडमध्ये दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. डिसेंबर महिन्यापासून मी सरकारला पाण्याचे योग्य नियोजन करावे याबाबत सातत्याने मागणी करत आहे. मात्र सरकारचे योग्य नियोजन नसल्यानेच लोकांना पाणी मिळत नाही. दुष्काळ,महागाई, बेरोजगारी भ्रष्टाचार बाबत भाजप सरकार गप्प आहे?
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसवर हल्लाबोल!
मराठा आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवू शकले नाही. सत्ता आली तर पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळेच न्यायालयाने एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण नाकरले आहे. यास सरकार जबाबदार आहे.
दुसऱ्यांचे पक्ष आणि घरे फोडून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली. स्वतःच्या हिंमतीवर निवडून या! खुद के दम पर सत्ता लावो भाई! अशी टीका सुळे यांनी केली. छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. सध्या ते आमच्या सोबत नसले, तरी आणि आता विरोधात असले, तरी ते आमचे नेतेच आहेत. त्यांच्यावर कधीच टीका करणार नाही. अमित शहा यांनी छगन भुजबळ यांना नाशिकची जागा देऊ असा शब्द दिला होता. मात्र अचानक छगन भुजबळ यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. हा भुजबळ यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे.
पुण्यात गुंडागर्दीमुळे जगणं मुश्कील! पुण्यातील नागरिक सध्या सुरक्षित नाहीत. कोयता गॅंग कोयता घेऊन बिनधास्त फिरत असून त्यांची दहशत वाढली आहे. दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही. गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिकांचे जगणं मुश्किल झाले आहे. याला सरकार जबाबदार आहे. आमची सत्ता आल्यास ही गुंडागर्दी संपवून टाकू, कोयता गॅंगचा बंदोबस्त करू असे आश्वासन सुळे यांनी यावेळी बोलताना दिले.











