बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला. या प्रसंगी सभेत अजित पवारांनी आक्रमक भाषण केले आणि यामध्ये शरद पवारांसह सर्व भावंडांचा देखील समाचार घेतला.
काल महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भाषण करताना अजित दादांना लक्ष्य केले होते. या सभेत रोहित पवार यांनी बारामतीतील अनेक संस्था शरद पवारांनी काढल्या असा उल्लेख केला होता. त्याचा समाचार घेताना अजित पवार यांनी शरद पवारांनाच लक्ष्य केले.
ते म्हणाले, जर पवार साहेबांनी सगळ्या संस्था काढल्या तर आम्ही 30-35 वर्षे काय केलं? अजित पवारांनी हे सांगताना शरद पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, बारामतीतील विद्या प्रतिष्ठान वगळता शरद पवारांनी कोणत्याही संस्था काढल्या नाहीत असेच उपस्थित मतदारांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार म्हणाले, छत्रपती कारखाना जाचकांनी काढला, माळेगाव कारखाना शेंबेकरांनी काढला. सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केला. कृषी विकास प्रतिष्ठान आप्पासाहेबांनी स्थापन केले, तर विद्या प्रतिष्ठान मात्र पवार साहेबांनी व इतर सहकाऱ्यांनी सुरू केले. इतर अनेक संस्था आधीपासूनच सुरू होत्या. असे असताना आता टीका करणारे रोहित पवार आणि अन्य जन्मले देखील नव्हते. त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांना हे सगळे कळले का?











