बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी व छत्रपती कारखान्याच्या शेतकरी कृती समितीचे युवा नेते विशाल निंबाळकर यांच्यावर आज संध्याकाळी रात्री आठच्या दरम्यान बेलवाडी नजीक अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विशाल निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
आज रात्री आठच्या दरम्यान संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर बेलवाडीनजीक चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना भेटून विशाल निंबाळकर व बाळासाहेब रायते हे सणसर कडे निघाले होते.
हे दोघेही दुचाकीवर होते व पाठीमागून त्यांच्या पाळतीवर असलेल्या चारचाकी वाहनातील सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. काही अंतरापर्यंत त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न चारचाकी मारुती स्वीफ्ट ही गाडी करत होती. त्यानंतर अचानक रस्त्याच्या कडेला गाडी घेत गाडीतून सगळेजण उतरले व हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्यांच्या साह्याने विशाल निंबाळकरांना मारण्यास सुरुवात केली.
यामध्ये दुचाकी पडली व त्यात बाळासाहेब रायते यांनाही किरकोळ जखम झाली. मात्र काही कळण्याच्या आतच विशाल निंबाळकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने विशाल यांना तातडीने लासुर्णे येथील देसाई हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की राजकीय वैमन्यस्यातून याचा शोध पोलीस घेत आहेत.











