महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीत आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनाच थेट लक्ष्य करीत त्यांच्या काळात देश रसातळाला गेल्याची टिका केली.
फडणवीस यांनी यावेळी बोलताना डॉ. मनमोहनसिंह हे सज्जन होते, मात्र त्यांचे सरकारवर कोणतेही नियंत्रण नव्हते, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कणखर सरकार देशात आहे, जे कणखरपणे निर्णय घेतात, त्यांनी जुनाट व्यवस्था मोडीत काढल्या व देश नव्या दिशेने चालवला असल्याचे ते म्हणाले. मोदीजींनी देशाला जागतिक सत्ता बनविण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत, ते स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल टाकत सन्यांसी योध्द्यासारखे देशासाठी निस्पृह वृत्तीने काम करीत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब थोरात यांनी मारला टोला..
दरम्यान फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूर्यावर थुंकण्याचाच हा प्रकार आहे, यातून वैचारीक बालिशपणा उघड होतो अशी टिका केली. थोरात यांनी यासंदर्भात अमेरिकेच्या अर्थतज्ञ, माजी राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा दाखला दिला. जेव्हा डॉ. मनमोहनसिंह एखाद्या विषयावर आपले मत मांडतात, तेव्हा ऐकत राहावे असेच त्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण असते, त्यामध्ये दिशा दाखविण्याचा भागही असतो असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. मनमोहनसिंहांच्याच काळात देशाने १० वर्षातील अखंड ७.५ टक्के जीडीपी वाढीचा वेग अनुभवला, मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीत ऐतिहासिक विक्रम केला आहे आणि रसातळाला जाणे म्हणजे काय असते हे मोदींनी दाखवून दिले अशी टिका केली.










