बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामतीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना दीड तासाच्या भाषणात वेळोवेळी टोले मारले. अजित पवार म्हणाले, सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की, आत्तापर्यंत निवडणुका व्हायच्या. तेव्हा फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटची सभा बारामतीत व्हायची, मात्र यांना आता प्रत्येक गावोगाव का फिरावं लागतंय?
अजित पवार म्हणाले, यांना हे का करावे लागते? माझी प्रशासनावर काय पकड नव्हती का? मी फुले शाहू आंबेडकर यांचाच विचार करून पुढे जातोय. बारामतीकरांनी हे लक्षात ठेवावे कुठेही भावनिक होऊ नका. हा विकासाचा रथ पुढे घेऊन जायचं असेल, तर घड्याळाशिवाय पर्याय नाही आणि मोदींशिवाय देखील पर्याय नाही. हे आता ज्यांना ज्यांना फोन करतात, ते लोक जर यांच्या पुढे आणून बसवले तर त्यांना ओळखताही येणार नाही.
मला 1990 मध्ये विद्या प्रतिष्ठानला विश्वस्त केलं 71 ते 90 या 18 वर्षात फक्त एक शाळा होती उच्च शिक्षणाची कोणतीही शाखा नव्हती, परंतु मी आल्यानंतर विद्या प्रतिष्ठान मध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतले. त्यावेळी साहेबांनीच मला सांगितले की, विद्यार्थी मिळणार नाही. खरोखरच पहिल्या वर्षी विद्यार्थी मिळाले नाहीत, पण मी चिकाटी सोडली नाही. मी इमारती बांधल्या. आता पंचवीस हजार विद्यार्थी शिकत आहेत.











