दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : राज्य सरकारच्या बेजबाबदार व गलथान कारभाराचा नमुना समोर आला असून मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील वाई तालुक्यात पाणीटंचाईची झळ असलेल्या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी डिझेलच्या पैशाचीच टंचाई असल्याची चर्चा आहे.
पैसे वेळेत दिले जात नाहीत अशी तक्रार असून पेट्रोलपंप चालकांची आधीचीच लाखो रुपयांची थकलेली बिले देण्यासाठी राज्य सरकारने पैसे दिले नाहीत असे सांगितले जात आहे. वाई शहरातील पेट्रोलपंप चालक उधारीवर डिझेल देत नसल्याने टंचाईग्रस्त गावांना पाण्याचा पुरवठा कसा करायचा? अशा अडचणीत ही यंत्रणा सापडली आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आहे. ती काही गावांपर्यंत मर्यादित असली, तरी पाणीटंचाईच्या गावांना कोणत्याही सुविधेची अडचण भासणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. डिझेल ला पैसे नाहीत ही सबब योग्य नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक प्रशासनाने वाईतील एका पेट्रोल पंप चालकाला विनंती करुन निधी येताच तुमचे सगळे बिल मिळेल असे सांगून डिझेल पुरवठा करण्याची सूचना केली. त्यानुसार डिझेल पुरवठा झाला, मात्र आता महिनाभरापासून बिले थकल्याने पेट्रोल पंप चालकांचेही हात टेकले आहेत अशी सूत्रांकडील माहिती आहे.











