अखेर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. येत्या 1 एप्रिल रोजी सासवड येथे जंगी सभा घेऊन त्यामध्ये आपण सर्व माहिती देणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.
आजही विजय शिवतारे यांनी अजित पवार आणि पवार कुटुंब यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, झुंडशाही आणि घराणेशाही विरोधात लढण्यासाठी विजय शिवतारे हे रिंगणात उतरलेले आहेत. विजय शिवतारे यांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे. विजय शिवतारे हे काही अजित पवारांना पाडण्यासाठी उभा राहिलेले नाहीत. काही जणांनी सांगितले की विजय शिवतरे यांच्या पाठीमागे शरद पवार आहेत. पण एक नवीन पर्याय, नवीन पर्व हे विजय शिवतारे यांचे असेल.
नवे पर्व सर्वसामान्यांचे सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतो आहोत. गावागावातून खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अजित पवारांनी काय केले हे सगळ्यांनाच माहिती आहे. परवा सुनील तटकरे यांनी सांगितले की, शिवतारे हे कोणाची स्क्रिप्ट वाचत आहेत? त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, मी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सांगितले आहे की, कधीही असल्या कोणत्याही गोष्टीसाठी विजय शिवतारे हा लढला नाही.
काल निरा नरसिंगपूरच्या मंदिरात ही देवाची शपथ घेतली आणि देवाला या निवडणुकीसाठी बळ देण्याची प्रार्थना केली. इंदापूर तालुक्यातल्या अनेक गावात लोक भेटून सांगत होते की, आता माघार घेऊ नका. लोक खूप चिडलेले आहेत. मी सगळेच काही आता इथे सांगणार नाही, पण एक एप्रिल रोजी सासवड मधल्या जंगी सभेत विजयाच्या सभेचा कानमंत्र असेल.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते चिडले, म्हणाले, मग मावळमध्ये आम्ही संजोग वाघेरे यांचा प्रचार करू!
दरम्यान विजय शिवतारे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्याचा निर्णय हा फक्त विजय शिवतारे यांच्या पुरता मर्यादित राहणार नाही, तर तो महायुतीत वादाची ठिणगी टाकणार असेल. त्याचा प्रत्यय लगेच आला. प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्त्यांनी शिवतारे जर असे वागणार असतील, तर आम्ही देखील मावळमध्ये संजोग वाघेरे यांचा प्रचार करू असाच इशारा दिला आहे.











