राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजला. मात्र उन्हाच्या उष्णतेमुळे तापलेलं नैसर्गिक वातावरण बरोबर आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पवार विरुद्ध पवार या कुटुंबाच्या वादामुळे राजकीय वातावरणही तापले असल्याचे चित्र आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
याबाबत महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दोन दिवसापूर्वी आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना घेराव घालून दबाव आणण्याचा प्रयत्न विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वासमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही.
यामुळे आमदार रोहित पवार व श्री. युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, असे लेखी मागणी खासदार सुळे यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक देशमुख यांच्याकडे केली आहे. दरम्यान , सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या लेखी मागणीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातच नव्हे राज्यात खळबळ उडाली आहे.
बारामती मतदारसंघात एक दहशतीचे वातावरण असून सत्तेचा गैरवापर होतो की आणि मतदान प्रक्रिया शांततेत होते की नाही ? संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतो की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. खासदार सुळे यांनी स्पष्टपणे आरोप केले नसले, तरी त्यांचे बोट मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या जात आहे.











