राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अवघ्या ३५ दिवसातच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदली केली. त्यानंतर पुन्हा नियुक्ती होईल अशी भाबडी अशा लोक ठेवून होते, मात्र ही बदली कायमचीच बदली होती, ती बहुधा राजकीय दबावामुळे झाली असल्याची चर्चा असून यादव हे शासकीय आणि राजकीय व्यवस्थेचे बळी ठरले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे देण्यात आला होता. ३५ दिवसाच्या कालावधीत चंद्रशेखर यादव यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या, शालेय मुली महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमीओंवर वचक बसवला होता.
गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी यादव यांनी केली होती, राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करत त्यांची दुकान बंद केली होती. पोलीस चौकीत मदतीच्या अपेक्षा नाही येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ असो किंवा महिला महिला यांना आदराची वागणूक व न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा तसेच खून, चोरी, दरोडे या गंभीर गुन्ह्याचा काही तासाचा छडा लावून आरोपींना जेरबंद केले होते.
शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावली होती. शहरातील बेकायदा अतिक्रमणे येणारा जाणारा नागरिकांना होणारा अडथळा यांच्याविरुद्ध व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढली होती. चुकीचे काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारणारे आणि फोन करणाऱ्या राजकीय नेत्यांना ते जुमानत नव्हते. त्यांच्या या दबंग कारवाईचे शहरातील व तालुक्यातील नागरिकाकडून कौतुक केले जात होते.
मात्र कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका कंपनीवर ड्रग्स प्रकरणी कारवाई झाली आणि याचा ठपका पोलीस निरीक्षक यादव यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ही बदली जरी ड्रग्स प्रकरणाच्या कारणावरून केली जरी असली तरी या मागे राजकीय वास नक्कीच आहे. ड्रग्स प्रकरणी या पोलीस निरीक्षक यादव यांच्या कारवाई केली असेल तर मग तशीच कारवाई दौंड पोलीस उपाधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हेही तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर बदलीची कारवाई का केली गेली नाही? ते या प्रकरणाला जबाबदार नाहीत का?
दौंड पोलीस ठाण्यात गेले पाच वर्षापासून काही पोलिस अधिकारी ठाण मांडुन बसले आहेत. कारण ते राजकीय नेत्यांच्या मर्जीप्रमाणे वागत आहेत, काम करत आहेत. हे पोलीस अधीक्षकांना माहिती नाही का? पोलीस अधीक्षकांच्या या अन्यायकारक बदली विरोधात दौंड शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला होता. रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला होता. यादव यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा दौंड पोलीस ठाण्याचा पदभार देण्याची निवेदनही पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले होते.
मात्र दौंडच्या नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत अखेर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दौंड पोलीस निरीक्षकपदी संतोष डोके यांची रात्री उशिरा नियुक्ती केली. अन् दौंड तालुका एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव सारख्या चांगल्या अधिकाऱ्याला मुकला. पोलीस निरीक्षक यादव यांच्यावर अन्यायकारक बदली झाली असताना दौंडचे विविध राजकीय प्रतिनिधी गप्प का होते? त्यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांना जाब का विचारला नाही? का या बदली मागे या साऱ्यांचा अप्रत्यक्षरीत्या हात तर नाही ना ? असा अनेक प्रश्न या निमित्ताने दौंड शहरातील व तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.











