शिरूर : महान्यूज लाईव्ह
रांजणगाव एमआयडीसी हद्दीत दहा फ्रिज ची चोरी करणाऱ्या आरोपीला रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील व्हर्लफुल या कंपनीमध्ये कंटेनर क्र. एन एल ०१ एन ७९३४ मधून सुमारे ९० फ्रिज घेऊन मल्लपूरम, केरळ कडे जायला निघाला होता. हा कंटेनर जात असताना चालकाने ११ फ्रिज हे सिल तोडून विक्री करून फरार झाला होता. याबाबत कंपनीचे अधिकारी दीपक खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारावर कंटेनर चालक बाळू राजेंद्र थोरे (रा. तींतरवानी, ता.शिरूर कासार, जि. बीड) यास अहमदनगर येथून ताब्यात घेऊन अटक केली.
अधिक चौकशी करत असताना पोलिसांनी आरोपीकडून कर्नाटक राज्यातून एका हॉटेलमधून विक्रीसाठी ठेवलेले एकूण १ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे दहा फ्रिज जप्त केले. उर्वरित फ्रिज चा तपास सुरू आहे. हा तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वैजनाथ नागरगोजे,तेजस रासकर,विजय शिंदे,माणिक काळकुटे यांनी केला आहे.











