दौंड, महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दौंड तालुक्यात खिंडार पडले आहे. तालुकाप्रमुख शंकर शितोळे यांच्यासह पदाधिकारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे गटाला बारामती लोकसभा मतदारसंघात धक्का बसला आहे.
दौंड तालुक्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांचे दौंड विधानसभा अर्थात दौंड तालुक्यात सातत्याने मागील काही दिवसापासून दौरे व व्यापारी, नागरिक यांच्याशी गाठीभेटी सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या या गटातून त्या गटात कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहेत.
तालुक्यातील कुरकुंभ येथे नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील मुख्यमंत्री शिंदे गटाचे तालुकाप्रमुख शंकर शितोळे व तालुक्यातील प्रमुख सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करीत उद्धव ठाकरे यांचे हात बळकट केले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेली विकास कामे, कोरोना मधील लक्षणीय कामगिरी, मराठी माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली शिवसेना या दोन गोष्टी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये अतिशय खोलवर बिंबलेली असून सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विषयी श्रद्धा असल्यानेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्य करीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. येत्या काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा घर वापसीचा निर्णय घेतील असा विश्वास शंकर शितोळे यांनी बोलताना व्यक्त केला.
राज्यात उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिक कामाला लागतील. चांगलं काम करण्याची धमक फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये असून त्यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना पुन्हा पुर्ण ताकदीने उभा करू अशी ग्वाही यावेळी जिल्हा संपर्क संघटिका मेघना काकडे यांनी दिली.
याप्रसंगी सहसंघटीका स्वाती ढमाले, उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दौंड तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











