पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील घटस्फोटाची ही कहाणी! लग्नाच्या अगोदर बऱ्याचदा गुण जुळतात का पाहतात. नवरा नवरीचे गुण कुंडलीत जुळले, ते बऱ्यापैकी जुळत असतील तर पुरोहित काका लग्नालाही परवानगी देतात, पण अशा प्रकारचे कुंडलीतील गुण जुळले तरी प्रत्यक्षात मानवी स्वभावातील गुण जुळतातच असं नाही. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ही घटना वेगळच काही सांगून जाते.
घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहे. या घटनेतील पती-पत्नीचा विवाह 2022 मध्ये झाला. मात्र विवाहानंतर एका महिन्यातच पती-पत्नीच्या लक्षात आले की, आपले स्वभाव व आवडीनिवडी जुळत नाहीत आणि मग दोघांनीही एका महिन्यातच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी समजावून सांगितले, परंतु काहीच फरक पडला नाही.
अखेर दोघांनी आपसातील संमतीने खेड न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. 14 फेब्रुवारी 2024 रोजी दोघांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी याची सुनावणी झाली आणि न्यायाधीशांनी या पती-पत्नीचा वैवाहिक वाद मिटत नसल्याने, त्या दोघांनी परस्पर सामंजस्याने दाखल केलेल्या घटस्फोटानुसार दोघांचा घटस्फोट मंजूर करत दोघांनाही विभक्त होण्यास परवानगी दिली.











