विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : पवार कुटुंबामध्ये राजकीय फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण भाजपसोबत का गेलो या संदर्भातील भूमिका एका पत्राद्वारे स्पष्ट केली या पत्राचे पडसाद राज्यात उमटत असतानाच आता बारामतीकरांची भूमिका या नावाने एक निनावी पत्र सोशल मीडियामध्ये वायरल होताना दिसतय.
सध्या सोशल मीडियावर बारामतीकरांची भूमिका हे निनावी पत्र व्हायरल होत आहे. या पत्राबाबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार म्हणाले, ज्यावेळी लोकांना दडपशाही झाली असं वाटतं. तेव्हा निनावी पत्र वाटायला सुरुवात करतात. या पत्राच्या माध्यमातून कुणीतरी खदखद व्यक्त केली आहे. मी आणि अजित पवार एकाच वयाचे आहोत.
अजित पवार १९८७ साली राजकारणात आले. शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे कदाचित मीही राजकारणात येईन असे त्यावेळी लोकांना वाटत होते. पण शरद पवार यांनी सांगितल्यानुसार मी शेती, व्यवसाय आणि सामाजिक काम करत राहिलो. त्यातूनच मी रोहित पवारांना एक मंच तयार करून देऊ शकलो. मात्र जर मी त्याच वेळी एखादी भूमिका घेतली असती, तर जे आज घडते आहे, ते 90 च्या दशकातच घडले असते, मात्र आपल्यापेक्षा शरद पवार यांना राजकारण जास्त कळतं. म्हणूनच ते सांगतील तो आदेश मानला आणि मी त्यावेळी माघार घेतली. अर्थात त्याचा फायदाही झाला. रोहित पवारांना त्यांचा मतदारसंघ नव्याने उभा करण्यात या कामाचा फायदा झाला.
बारामतीकरांची भूमिका या निनावी पत्रात काय आहे?
सोशल मीडियात वायरल होत असलेल्या या पत्रात पवार कुटुंबातील शेकाप आणि काँग्रेस या वसंतराव पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्षाचाही मुद्दा मांडलेला आहे, तसेच अजित पवार यांनी विनाकारण हा राजकीय सत्तांतराचा विषय भावभावकीच्या तालावर आणून ठेवलेला आहे असेही नमूद करण्यात आले आहे.
1990 च्या काळात राजकारणात कोणाला आणायचं, तर आप्पासाहेब पवार आणि शरद पवार यांनी ठरवले आणि अजित पवार राजकारणात आले. मात्र त्यावेळी राजेंद्र पवार यांची क्षमता असूनही त्यांना बाजूला ठेवण्यात आले असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी इच्छा असूनही राजेंद्र पवार यांना राजकारणात येता आले नाही आणि राजेंद्र पवार यांनीही बंड केले नाही.
मात्र तिसऱ्या पिढीमध्ये रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा मुद्दा पुढे आला आणि तिथूनच राजकारणाला खदखद सुरू झाली, असा उल्लेख यामध्ये वेगळ्या शब्दात करण्यात आला आहे.











