सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापुरात उद्या रविवारी (दि.२५)शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या सत्तेत गेल्यानंतर इंदापुरातील अजित पवार यांची ही पहिली सभा असून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपा व राष्ट्रवादीची युती असतानाही इंदापुरातील भाजप व राष्ट्रवादीच्या सुप्त संघर्षावर अजित पवार काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. इंदापूर शहरातील पोलीस ठाण्यासमोरील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सकाळी दहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे असणार आहेत.
इंदापुरातील होणाऱ्या या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, ॲड. शुभम निंबाळकर, सचिन सपकळ यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रदीर्घ कालावधीनंतर व बऱ्याच घडामोडी घडून गेल्यानंतर अजित पवार इंदापूरात येत आहेत.
राज्यात सत्तेत असतानाही इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट केले जात असताना हर्षवर्धन पाटीलही सभांमधून सडेतोड उत्तर देत आहेत. त्यांनी पाठीमागील काळात गद्दारी झाल्याचा आरोप केला आहे. अशा संघर्षमय परिस्थितीत अजित पवार संपूर्ण घडामोडींबाबतची आपली व पक्षाची भूमिका ते स्पष्ट करणार असल्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्याच्या भावी काळात विकासाच्या संदर्भातही ते भाष्य करणार आहेत.











