राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांची बदली झाल्यानंतर अनेक जण श्रे स्वयंस्फूर्तीने सन्मान करतात. फेटा बांधतात. भावपूर्ण निरोप देतात, कोणी पुष्पहार घालतात, कोणी फुलं उधळतात तर पोलीस कर्मचारी त्या गाडीला दोरखंड बांधून ती गाडी ओढत नेतात, असे चित्र अनेकदा आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता इथून पुढे हे चित्र पाहायला मिळणार नाही.
त्याचं कारण असं की, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक नव्याने परिपत्रक जारी करत अशा प्रकारचा कोणताही निरोप समारंभ झाला तर अशा अधिकाऱ्यांवर त्याच्या वरिष्ठांनी तातडीने कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांना असे वाटते की, अशा प्रकारचे निरोप समारंभ हे कुठेही स्वयंस्फूर्तीने होत नाहीत, उलट अशा गोष्टीचे फोटो किंवा व्हिडिओ चर्चेत आणून स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारीच असा स्टंट करतात.
तसेच आपल्या ओळखीच्या सेवाकाळात चांगल्या ओळखी झालेल्या किंवा लाभ दिलेल्या लोकांकडून किंवा हस्तकाकरवी अशा प्रकारचा प्रकार करून घेतला जातो. अशा स्वरूपाचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांचा आहे. त्यातूनच शुक्ला यांनी एक परिपत्रक जारी केले आहे, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली झालेले अधिकारी जेव्हा अशी कृती करतात, तेव्हा ते पोलीस गणवेश परिधान केलेला असतो. त्यांना रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा अतिप्रमाणात वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवून संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी, अंमलदारांनी वाहन ओढून नेणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत.
त्यांना शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसारखा त्यांना निरोप दिला जातो, हे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून नाहीत. अशा प्रकारच्या गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अधिकारी स्वतः किंवा त्याच्या हस्तकामार्फत स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यामुळे उलट ते जनमानसात चेष्टेचा व उपहासाचा विषय बनतात. स्थानिक नागरिक हे अधिकाऱ्याने केलेल्या चांगल्या कामाचा कर्तुत्वाचा नेहमीच सन्मान करतात, पण अशा दिखाव्याचा सन्मान करत नाहीत.
त्यामुळे अशा प्रकारचे यापुढील काळात निरोप समारंभ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि जर अशा प्रकारचे निरोप समारंभ झाले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाचे आदेश रश्मी शुक्ला यांनी 21 फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
परिपत्रक योग्यच; परंतु ते काढावेच का लागते? : तुषार झेंडे पाटील, सदस्य महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद.
नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार कोणत्याही अधिकाऱ्याला साधे एक गुलाबपुष्पही नागरिकाकडून स्वीकारता येत नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला निरोप समारंभ खात्याच्या परवानगीशिवाय घेता येत नाही, तसेच त्याला सेवारत असताना कोणतीही भेटवस्तू स्वीकारता येत नाही. कोणताही सरकारी अधिकारी थेट माध्यमांशी संपर्क ठेवू शकत नाही. काही माहिती द्यायची असल्यास माहिती अधिकारी अथवा माहिती कार्यालयाशीच त्यांनी संपर्क साधणे अपेक्षित असते. यामध्ये शिस्तभंगाची देखील कायद्यामध्ये तरतूद आहे. याचा विचार करता रश्मी शुक्ला यांनी काढलेले परिपत्रक योग्य आहेच, परंतु ते का काढावे लागते हा सुद्धा एक प्रश्न आहे. आतापर्यंत बऱ्याच अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या निरोप समारंभाच्या रिल्स बनवून सोशल मीडियात प्रसारित केलेल्या आहेत.











