दौंड, महान्यूज लाईव्ह
शालेय मुली व महीलांची छेडछाड करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणाऱ्यांवर दौंड पोलिसांनी नुकतेच कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींना त्रास देण्याच्या घटना पाहता दौंड पोलिसांनी विशेष लक्ष घातले आहे. दौंड पोलिसांनी मागील काही दिवसांत घडलेल्या छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १९ एप्रिल २०२३ रोजी आरोपी राकेश उर्फ रोहित विजय गुळीग (रा. वडारगल्ली ता. दौंड) याच्याविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल होता. सन २०२० रोजी आरोपी महेश दिलीप रंधवे (रा. मलठण ता. दौंड) याच्यावर छेडछाडीसह पोस्कोचा गुन्हा दाखल होता. तर ६ जुलै २०२३ रोजी आरोपी लॉरेन्स विल्यम विश्वास (रा.वेताळनगर दौंड) याच्याविरुद्धही छेडछाड व पोस्कोचा गुन्हा दाखल होता.
या गुन्हातील आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने मुली- महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायम सतर्क असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत विशेष मोहीम राबवून महिलांची छेडछाड व त्रास देणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दौंड पोलिसांनी अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या या फरार आरोपीना अटक केली आहे. दोन आरोपींना दौंड न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी ही कारवाई केली आहे. या घटनांचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.











