राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील अर्थ केमिकल कंपनीत एम डी ड्रग्सचे कनेक्शन असून ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ६०० किलो ड्रग्स सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मंगळवारी (दि २०) कुरकुंभ एमआयडीत अचानक पुणे शहर पोलिसांचा १० गाड्यांचा ताफा येऊन एमआयडीसीत धडकला. एमआयडीसी मधील अर्थ केमिकल कंपनीवर धाड पडल्याने कुरकुंभ एमआयडीसीत नव्हे तर तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे.
कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीमध्ये ड्रग्सचा साठा आणि उत्पादन होत असुन तो मोठ्या शहरांमध्ये वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आज पुणे शहर पोलीसांनी धाड टाकली असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रींन(एम डी) ड्रग सापडले असल्याची प्राथमीक माहिती मिळत आहे.
दरम्यान, सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुंभ येथील कंपनीशी निगडीत असल्यानेच ही धाड पडली असल्याची चर्चा आहे. कुरकुंभ एमआयडीसी केमिकल झोन असून यापूर्वी देखील अनेकवेळा काही कंपन्यांवर अशा प्रकाराच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कंपनीत आणखी किती ड्रग साठा आहे याबाबत पोलीसांची कारवाई सुरू आहे.
दरम्यान पुण्यामध्ये ड्रग्स पोलिसांनी पकडले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत दोन कोटी रुपये असून मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या दोन परदेशी ड्रग पेडलरना त्याची विक्री वैभव माने, अजय कारोसिया आणि हैदर शेख हे तिघेजण करणार होते. याची सगळी माहिती मिळाल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आणि पुण्यात मेफेड्रीन ड्रग जप्त करण्यात आले होते. त्यातील सखोल तपासानंतर पोलिसांची नजर कुरकुम कडे वळली आहे.











