शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर येथील घोडनदी पात्रात हातपाय बांधून खून करून मृतदेह टाकणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात पुणे ग्रामीण गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत शिरूर जवळ घोड नदी पात्रात पाचर्णे मळा जवळ हातपाय बांधण्यात आलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.
अज्ञात मयत व्यक्तीचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे शिरूर व पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सदर मयताचे वर्णन असलेले माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. तसेच शोध सुरू होता. अखेर मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले व सदर मयत व्यक्ती कृष्णा गोकुळ विघ्ने (वय.३२, रा.आनंदगाव, शिरूर कासार, जि.बीड) असे नाव असल्याचे निष्पन्न झाले.
या व्यक्तीचा तपास घेतल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू ठेवला.यावेळी हा खून त्याचा भाऊ अजिनाथ विघ्ने, चुलता पांडुरंग विघ्ने, गणेश नागरगोजे यांनी केला असल्याचे समोर आले. पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, मयत कृष्णा हा व्यसनी होता. सतत जमीन विक्री करा म्हणून भांडण करत असे. या कारणावरून आरोपींनी त्यास पीकअप वाहनात आणून हातपाय बांधून खून करून मृतदेह शिरूर घोडनदी पात्रात टाकून दिले असल्याचे निष्पन्न झाले.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अरुण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, सचिन भोई, संतोष साळुंके यांनी केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करत आहेत.











