दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हाणामारीच्या घटनेनेच पार पडला. तालुक्यातील पाटस येथे जागेच्या वादातून दोन गटात बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २६ जानेवारी रोजी जागेच्या वादातून दोन गटांत हाणामारीची घटना घडली. धैर्यशील जाधवराव व जाधवराव कुटुंबातील सहा जण, त्यांचे अज्ञात अंगरक्षक व इतर ३० ते ४० अज्ञात महिलांनी पाटस येथे बेकायदेशीर जमाव जमवून हवेत गोळीबार करून बंदुकीचा धाक दाखवून भागवत कुटुंबातील वंदना भागवत व शकुंतला भागवत व इतर भागवत कुटुंबातील इतर व्यक्तींना धक्काबुक्की केली व हॉकी स्टिक, लाकडी दांडके व लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी अनिकेत भागवत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने धैर्यशील जाधवराव, दिग्विजय जाधवराव, अभिजित जाधवराव वीरसिंह उर्फे पिपु जाधवराव, समीर जाधवराव (सर्व रा. पाटस गारफाटा ता. दौंड जि. पुणे), आसिफ शेख व १ अज्ञात अंगरक्षक ( पुर्ण नाव व पत्ता माहित नाही.) यांसह अज्ञात ३० ते ४० महिलांविरोधात बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
भागवत कुटुंबातील १० जणांनी तुम्हाला ५ गुंठे जागा दिली, परंतु तुम्ही जास्त जागा का वापरता? असे म्हणत धैर्यशील दीपक जाधवराव व दिग्विजय दीपक जाधवराव यांना मारहाण केली असल्याची फिर्याद वीरसिंह चंद्रशेखर जाधवराव यांनी दिल्याने अभिजीत भागवत, अनिकेत भागवत, कोमल भागवत, गौरी भागवत, शकुंतला भागवत, वंदना भागवत, सोनाली भागवत, मालन भागवत, ललिता भागवत, दिगविजय भागवत (सर्व रा. पाटस गारफाटा ता. दौंड जि. पुणे) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. या यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भानुदास बंडगर व पोलीस हवालदार संजय देवकाते अधिक तपास करीत आहेत.











