शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी व शिरूर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांची बदली झाल्याने या दोन्ही पोलिस स्टेशनला कोणाची वर्णी लागणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
शिरूर पोलिस स्टेशन येथे काही महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून संजय जगताप यांची नेमणूक झाली होती. तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे महेश ढवाण यांची नेमणूक झाली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत त्यांनी शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते.
शिरूर पोलिस स्टेशन येथे संजय जगताप यांनी नियुक्ती होताच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले होते. त्याचबरोबर नागरिकांशी सलोख्याने संबंध ठेवत बऱ्याच अंशी गुन्हे कमी करण्यास प्राधान्य दिले होते.
नुकतीच रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची सोलापूर तर संजय जगताप यांचीही सोलापूर येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आली आहे.रांजणगाव एमआयडीसी व शिरूर हे तसे “हेवी”पोलिस स्टेशन समजले जात असून दोन्ही क्रीम पोस्टिंग साठी अनेकांची फिल्डिंग असल्याचे समजते. या दोन्ही ठिकाणी कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये असून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे











