पुणे – महान्यूज लाईव्ह
बारामती अॅग्रो कंपनीच्या कथित कर्जप्रकरणात ईडीने कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवले होते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी विधानभवनात जाऊन छत्रपती शिवरायांना व विधानभवनाला अभिवादन करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले आणि सुप्रिया सुळेंसमवेत इडीच्या कार्यालयात हजेरी लावली, तब्बल ११ तास चाललेल्या चौकशीनंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयाबाहेर आले आणि आपला इरादा कायम असल्याचे ठासून सांगितले.
रोहित पवार यांनी काल ईडीच्या कार्यालयात आपली कागदपत्रे सूपूर्त केली, तेव्हा मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली होती. रात्री जेव्हा रोहित पवार ही चौकशी संपवून बाहेर आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी दिवसभर थांबून ईडी व भाजपविरोधी घोषणा दिल्या.
दरम्यान याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या चौकशीवरून सरकारवर टिका केली. विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवरच चौकशीसाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात असून ईडी ही भाजपची शाखा बनल्याचा आरोप केला. दरम्यान रोहित पवार यांची चौकशी सुरू असताना खुद्द शरद पवार हे तब्बल १० तास राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात थांबून होते.
रात्री उशिरा रोहित पवार बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना या चौकशीची माहिती दिली. त्याचबरोबर यानंतर एक फेब्रुवारी रोजी देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवी काही कागदपत्रे घेऊन येण्यासंदर्भात सुचवले असून आपण तीही कागदपत्रे कडे सोपवणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
आम्ही अधिकाऱ्यांना जे मागतील ते सगळी माहिती देऊ, मात्र जर कोणी सूडबुद्धीने कारवाई करत असेल तर त्यालाही तशाच प्रमाणात उत्तर दिलं जाईल आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही. महाराष्ट्र धर्माचा हा विचार आम्ही कायम बरोबर ठेवू. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची आमची तयारी असल्याचे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.











