बारामती – महान्यूज लाईव्ह
घटना बारामती तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील आहे. मागासवर्गीय समाजातील पिडीतेशी आंतरजातीय विवाह करण्याचे अमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केले व गर्भपात करून तक्रार करू नये यासाठी तिच्याशी विवाहाचे नाटक करून अपमानास्पद वागणूक दिली, म्हणून पिडीतेने धुमाळवाडीतील पाच जणांवर बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे.
बारामती तालुक्यात यापूर्वीच असाच एक गुन्हा बाबुर्डी येथील युवक व त्याच्या कुटुंबावर काही दिवसांपूर्वीच दाखल झाला होता. त्यानंतर आता धुमाळवाडीतही असाच प्रकार घडला आहे, यातील पिडीता ही सध्या पुण्यातील हडपसर परिसरात राहते. तर तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित करून लग्नाचे नाटक केलेला पती परदेशात नोकरी करतो. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विक्रम हनुमंत कदम, हनुमंत यल्लाप्पा कदम, जयश्री हनुमंत कदम, किरण हजारे(मामा) व कावेरी चेतन ननवरे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे करीत आहेत.
यासंदर्भात २७ वर्षीय पिडीतीने दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना १४ एप्रिल ते २० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान घडली. विक्रम कदम याने पिडीत युवती ही मागासवर्गीय असल्याचे माहिती असूनही तिच्याशी भावनिक नाते जोडून तिची इच्छा नसतानाही लग्नाचे अमिष दाखवत तिच्याशी पुण्यातील विविध लॉजवर शारिरीक संबंध प्रस्थापित केले व बेकायदेशीर गर्भपात केला. त्यानंतर लग्नास नकार दिला, मात्र तक्रार देऊ नये यासाठी कट रचून ७ ऑक्टोबर २०२३ रोजी लग्न केले व कोणतेही संबंध न ठेवता विक्रम हा सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी निघून गेला. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२३ रोजी पिडीत युवतीला जातीवाचक वक्तव्ये करून अपमान करून व अस्पृश्यतेची वागणूक देऊन घरातून कुटुंबियांनी हाकलून दिले अशा स्वरुपाची फिर्याद पिडीतेने माळेगाव पोलिसांकडे दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला.











