दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वहागाव (ता.वाई) येथील फाट्यावर महामार्ग ओलांडताना झालेल्या अपघातात आदिती निंबाळकर (वय- १७ रा. वहागाव ता. वाई) या युवतीचा मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वहागाव येथील युवती आदिती निंबाळकर ही वाई येथील किसन वीर महाविद्यालयात इयत्ता ११ वी मध्ये शिकत होती. ८ जानेवारी रोजी ५ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान कॉलेज संपल्यानंतर ती वाईवरून सुरूरपर्यत एस.टी. ने आली. सुरूर फाट्यापासून सुरूर व वहागावचे विद्यार्थी पायी गावापर्यंत महामार्गाच्या सेवारस्त्याने प्रवास करीत असतात.
दरम्यान आदिती सुरूरच्या मैत्रिणींसोबत सुरूर गावापर्यंत सातारा पुणे लेनच्या सेवारस्त्यावरून चालत आली. सुरूर येथील सर्व्हिसिंग सेंटरपासून वहागाव फाट्याच्या समोर रेलिंग नाही, अदितीने येथूनच महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान सातारा पुणे लेनवरून भरधाव वेगात मारुती वॅगनआर कार अचानक समोर आल्याने गोंधळलेल्या आदितीने रस्ता क्रॉस न करता मागे आली व पुन्हा रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारच्या डाव्या बाजूची हेडलाईटनजीकची जोरदार धडक बसली. तिला तातडीने कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली आहे.
भरधाव वेगाचा परिसरातील दुसरा बळी
थोड्याच दिवसापूर्वी कवठे येथे महामार्ग ओलांडताना पुणे येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. आता या युवतीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी या परिसरात अंडरपास पूल आहेत. मात्र या पुलांचा वापर न करता अतिघाईमध्ये जीव धोक्यात घातल्याने असे अपघात घडत आहेत.











