अवघ्या चार वर्षाच्या मुलाच्या खून प्रकरणी गोव्यात माईंड फुल ए आय लॅब या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी सूचना सेट हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिचा दोष काय? गुन्हा काय? तर तिने पोटच्या मुलाची हत्या केली!
चार वर्षाच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह तिने बॅगेत टाकला होता आणि ती गोव्यावरून कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात निघाली होती. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे ती पोलिसांच्या ताब्यात आली. सूचना सेठ ही एका कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी असून ती आर्टिफशियल इंटेलिजन्स मध्ये एक्सपर्ट आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी ती राहते.
आपल्या चार वर्षाच्या मुलासह ती गोव्यात सुट्टीच्या निमित्ताने आली होती. घटस्फोटीत पती सातत्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो, मात्र त्याची आणि मुलाची भेटच होऊ नये यासाठी सूचना सेट हिने एवढं मोठं दुष्कृत्य केलं. गोव्यातील कॅन्डोलिम या भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली.
मुलासह आलेली सूचना सेठ घरी परतताना तिच्याबरोबर मुलगा नव्हता. हा संशय हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आला आणि त्यांनी जेव्हा हॉटेलची खोली पाहिली, तेव्हा रक्ताचे डाग पाहून त्यांना धक्का बसला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितली आणि व्यवस्थापकाने पोलिसांना! गोवा पोलिसांनी टॅक्सी चालकाचा नंबर शोधून काढत सूचना सेट हिला ताब्यात घेतले.











