सुपे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपे येथील जनाई सिंचन योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी सिंचन भावनांमध्ये काल गेले होते. या ठिकाणी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांसमोर शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणे मांडलं, पण त्यात त्यांच्या हातात काहीच आलं नाही! एवढेच नाही, या कार्यालयात शेतकऱ्यांना तीन तास उभे राहून पाणी सुद्धा मिळाले नाही!
जनाई सिंचन योजनेचे पाणी वेळेवर व शिस्तबद्ध रीतीने मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन भवनात अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या हातात काहीच आशादायक पडलं नाही, असं इथले शेतकरी सांगत होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या या वागणुकीच्या नंतर शेतकऱ्यांनी सुप्यामध्ये पुन्हा एक बैठक घेतली.
जनाई योजनेच्या हक्काच्या पाण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी या शेतकऱ्यांनी सुप्यामध्ये बैठक घेतली यावेळी शेतकरी कृती संघर्ष समितीचे सदस्य आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली आणि काही भागातच पाणी मिळते ठराविक भाग हा वंचित राहतो त्यामुळे हक्काचे पाणी मिळण्यासाठी 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.











