दौंड, महान्यूज लाईव्ह
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला उसाच्या शेतात नेऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी दौंड तालुक्यातील मलठण येथे घडली. उसाच्या शेतात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने साडीला लागलेल्या आगीच्या भडका उडून ऊसाच्या शेतातही काही प्रमाणात आग लागली होती.
दरम्यान, आरोपी पती विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. राहुल विष्णु लोंढे ( रा. मलठण ता.दौंड. जि पुणे ) असे या आरोपी पतीचे नाव असून गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे (वय ३५ ) असे या पीडित पत्नीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे या आपल्या पतीसोबत शनिवारी (दि ६) पहाटे सहा वाजता शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतात कांदा लागवडीचे काम चालू होते. कांदे लागवडीचे काम झाल्यावर सकाळी अकरा वाजण्याच्या आसपास पती राहुल याने उसाला पाणी द्यायचे आहे असे म्हणाल्याने उसाचे शेजारी गेल्यावर पती राहुल यांनी काय समजायच्या आतच त्यांचे जवळ असलेल्या पिशवीमध्ये आणलेले पेट्रोल अंगावर टाकले. व उसामध्ये ढकलून अंगावर काडीपेटी लावून पेटवून दिले.
काही क्षणातच आगीच्या भडक्याने साडीने पेट घेतला, यातून सावरत उसातून बाहेर आल्यावर पुन्हा पतीने उसाचे शेतात ढकलले, तेव्हा तेथे उस पेटलेला होता, पेटलेल्या उसात ढकलल्यामुळे पुन्हा ओरडत ओरडत रस्त्याच्या कडेने ती पळाली. त्याठिकाणी आसपासचे लोक जमा झाल्याने लोकांच्या मदतीने उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
मात्र, तेथुन पुन्हा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पत्नी गौरी उर्फ सुमन लोंढे हिने पती राहुल विष्णु लोंढे हे सतत चारीत्राचा संशय घेऊन तसेच घरगुती कारणांमुळे आणि तु मला आवडत नाही या कारणांवरून वाद घालत होते. शनिवारी त्यांनी जिवे मारण्याच्या उददेशाने अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
ही फिर्याद दिल्याने पती राहुल लोंढे यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पती राहुल लोंढे यालाही भाजले असल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक शहाजी गोसावी हे करीत आहेत.











