नानाची टांग
डोक्याचं झालं दही आणि दुधाची आटली साय! जाहीर केला तुम्हीच, पण त्यो जीआर अजून निघाला नाय! दूध उत्पादक देशधडीला, सरकारचा घोडा पाण्यात न्हाला..उद्योजकानं मारला डोळा आणि दुधाचा दर 34 वरनं 29 वर आला..!
दूध निघतंय कमी, पाणी संपलं विहिरीचं..! जित्राबं माणसाइतकीच प्यारी, सांगा चाऱ्याचं काय करायचं? प्रश्न आहेत सतरा; डोक्याची झालीय जत्रा! या यातनेतनं बाहेर कसं पडायचं? ना कर्त्याचा नाही, आमचाही दररोजचा फुका जातोय दिस- वार! . अवं पाटील सरकार, कधी निघणार तुमचा जीआर?
सरकार मायबाप असते म्हणतात; मंत्री बोलला धीर धर..! काळजी नको करू, आम्हाला फक्त मतदान कर! मी म्हणलो, अवं साहेब शपथेवर सांगतो, पिढ्यानपिढ्या आम्ही,तुमच्याच मागं..सदैव तुम्हाला जोडून असतो कर! आजा, बापापाठोपाठ मी सुद्धा तुमचाच पाईक सरकार, पण आता सोसवेना, धीर धरवेना, होतोय त्रास फार! सांगा ना, अवं सरकार… कधी निघणार तुमचा जीआर?
अमिष दाखवलं, दुप्पट उत्पादनाचं, दुप्पट उत्पन्नाचं, पण वावराला साऱ्या घोडा, तर ऊसाला कोल्हा लागला!दुधभाव सांगितला पाचचा, तर 34 वरून 29 आणला..!कळंनाच मले, दिलासा मिळाला का, कात्रज चा घाट दाखवला..!!
साठ एकराचं वावर पण सोंगं झाली फार..! एक पीक धड पिकत नाही, त्यापरीस नाचायला सुद्धा जास्त पैसे घेते नटरंगी नार! एक जानेवारीला काढतो बोलला, एकदाचा काढा ना तो जीआर, फीआर..! एक मात्र काळजी घ्या, पाटीत होऊ देऊ नका वार..! अवंय.. सरकार कधी निघणार तुमचा जीआर? अवंय.. सरकार कधी निघणार तुमचा जीआर?
भुकेलेल्या पोटांनी एकदाचा हात जोडतो..विचारांचे कावळे ओरडताहेत खरं खरं सांगतो..!! प्रोसेस अशी असतेच कसली? दुधाचा भाव दुप्पट वाढतो! आमच्या खिशात पैसा नाही, खाणाऱ्यांना शुद्ध दूध नाही! खरंच सांगा मायबाप, अजून किती दिवस तळतळाट घेणार?उद्योगांना जागेवर आणत, न्याय आम्हाला कधी देणार?
चर्चा अशी आहे की, सरकार तर उद्योजकांच्या पाठीशी…! सवंग लोकप्रियतेच्या घोषणा आणि शेतकरी मात्र उपाशी! असं काही होऊ देऊ नका, रात्र कमी अनं सोंगं फार! अवंय सरकार.. आवं आवं सरकार, काढताय नव्हं त्यो जीआर?











