पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात गेल्या सहा महिन्यात दोन ते तीन वेळा पोलिसांनी कोयता गॅंगच्या मुसक्या आवळल्या, कोयता गॅंगचे अनेक गुन्हेगार ताब्यात घेतले, तरी देखील अजूनही पुन्हा पुन्हा कोयता गॅंग तयार होत आहेत, काल रात्री येरवडा परिसरात अज्ञात कोयता गॅंगच्या गुन्हेगारांनी वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड केली. ज्यामध्ये रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता.
येरवडा परिसरात काल रात्री ही घटना घडली असून यामुळे परिसरात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण आहे. काही चारचाकी वाहन चालकांनी या संदर्भात पोलीस ठाण्यातही तक्रार दिली. यावरून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितगारांच्या साह्याने संबंधित अज्ञात गुन्हेगारांच्या शोधात आहेत.
दुसरीकडे रस्त्यावर उभ्या केलेल्या, पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी फोडण्याचे सत्र पुणे शहरात सुरू असल्याने, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अर्थात ही दहशत वाढवण्यासाठी संबंधितांनी कोयत्याच्या सहाय्याने गाड्या फोडल्याचे दिसून आले आहे.











