दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई शहर आणि तालुक्यातील गावांमध्ये बावधन नाका येथील भंगारवाले निर्माण करत असलेली दहशत मोडीत काढण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी या मागणीसाठी वाई व तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरीक व व्यापाऱ्यांनी आज मोर्चा काढला.
महागणपती मंदिर घाटापासून हा मोर्चा काढून किसनवीर चौकामार्गे तो वाईच्या तहसील कार्यालयावर धडकला व वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे या उपस्थित होत्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनाही मोर्चाने जाऊन यांच्यावर कारवाई करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले आहे.
वाई शहर हे पुरातन काळापासून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. अशा शहरात मस्तावलेल्या भंगारवाल्यांनी लोकांच्या खाजगी मालकीच्या जमीनी दहशत निर्माण करुन त्या बळकावल्या. त्यावर अनाधिकृतपणे घरे बांधली आहेत. जागा मालकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या कुटुंबियांवर हे एकत्रित येऊन तलवारी, कोयते, लाठ्या काठ्या घेऊन महिलांना पुढे करुन हल्ले करुन प्रचंड दहशत निर्माण करतात असा या मोर्चाकऱ्यांचा आरोप होता.
वाई पोलिसांनी काही जणांना तडीपार देखील केले, मात्र उलट त्याचाच राग मनात धरून उलटा मोर्चा काढण्याचा पराक्रम हे लोक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करावी व त्यांच्या प्रशासनाच्या अधिकाराविषयी जरब निर्माण करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली तसेच वाई शहरातील शासकीय आणि खाजगी मालकीच्या ज्या जमीनी बळकावलेल्या आहेत, त्या येत्या पंधरा दिवसांत खाली केल्या नाहीत, तर पुन्हा महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा इशाराही मोर्चाच्या आयोजकांनी दिला आहे .











