पुणे – महान्यूज लाईव्ह
प्रत्येक दुकानात आजकाल उधारीबाबतचा एक वाक्यप्रयोग किंवा त्याचे स्लोगन आपल्याला पाहायला मिळते. गिऱ्हाईक म्हणजे राजा.. आणि राजा कधीही उधार मागत नाही.. किंवा आयुष्यभऱाचे संबंध खराब करते, ती म्हणजे उधारी किंवा लिहून ठेवा, नंतर देतो. पाठवून देतो, देवून टाकू, भरोसा नाही काय, पळून चाललोय का? असे विविध बोर्ड असूनही त्याच दुकानात उधारीवरचा धंदा सुरू राहतोच, पण पुण्यात या उधारीचा मोठा फटका एका मटण विक्रेत्याला झाला.
मटण किती उधारीवर असावे? तर पुण्यात एका व्यवहारातील मटण घेऊन जाणाऱ्या हॉटेल मालकाने चक्क ६१ लाख रुपये चार वर्षात उधारी ठेवली आणि ती देण्यास टाळाटाळ केली, म्हणून एक मटण विक्रेता चक्क पोलिस ठाण्याची पायरी चढला आणि पुण्यात प्रथमच मटणाच्या उधारीवरचा एक गुन्हा दाखल झाला.
पुण्याच्या लष्कर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे तो कोंढवा येथील अफझल बागवान व अहतेशाम बागवान या दोघांविरोधात. आणि त्यासाठी मटण विक्रेत्याने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या फिर्यादीतील मजकूरानुसार लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून बागवान याच्या हॉटेलला मटणाचा पुरवठा होत होता.
सन २०१९ ते २०२३ या कालावधीत तब्बल २ कोटी ९१ लाख ८१ हजारांचे मटण पुरविण्यात आले, हॉटेलमालक बागवानांनी २ कोटी ३० लाख १९ हजार रुपये या मटण विक्रेत्याला दिले. मात्र उर्वरित ६१ लाख ६२ हजार रुपये परत केले नाहीत. बागवान सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने मटण विक्रेत्याला पोलिसांचा आधार घ्यावा लागला. या मटण उधारीची सध्या पुण्यात चर्चा आहे.











