दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातुन गेलेल्या अष्टविनायक महामार्गावर जादा उसाने भरलेल्या उसाच्या ट्रॅक्टर वाहतूकी मुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांनी ही उस वाहतूक करण्यासाठी शहराच्या बाहेरील पर्याय रस्त्याचा दळणवळण करण्यासाठी वापर करावा अशी मागणी दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या साखर कारखान्याच्या गळ्यात हंगाम सुरू आहे. दौंड तालुक्यातील दौंड शुगर व भीमा पाटस साखर कारखाना तसेच कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यासाठी ऊस वाहतूकीसाठी बैलगाडी, ट्रक व ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो.
ट्रकमध्येही अतिरिक्त प्रमाणात ऊसाची वाहतूक केली जाते. तसेच ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉली लावून प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जाते. नियमांचे उल्लंघन करून हे वाहतूक केली जात आहे. शिवाय दौंड शहरातून गेलेल्या अष्टविनायक मार्गावरून रात्रंदिवस सुरू आहे. ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे सध्या सिद्धार्थनगर ते भीमनगर या अंतरावर ठिकठिकाणी छोट्या-मोठे अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे.
मागील वर्षी एका तेरा वर्षाच्या बालकाचा उसाच्या ट्रॅक्टरखाली अपघात होऊन जीव गमावल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दुसरीकडे सिद्धार्थनगर ते भिमनगर दरम्यान या ऊस वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शहरातील नागरिकांना ये -जा करताना मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे ही उस वाहतूकीचा रस्ता बदलावा किंवा हे वाहतूक रात्रीच्या वेळी करण्यात यावी असे निवेदन दौंड शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दौंड पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अश्विन वाघमारे, अजिंक्य गायकवाड, रमेश तांबे, संजय जाधव, शहराध्यक्ष सैफ भाई मणियार, अक्षय शिखरे, संतोष कांबळे, राजेश ओव्हाळ, अमित जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.











