राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथे भीमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस सुरू असलेल्या आणि लिलावाच्या नावाखाली होत असलेल्या बेसुमार वाळूच्या उपशावर अखेर दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये वाळूने भरलेला ट्रक, पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉली व व दोन फायबर बोटी असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
संदीप संभाजी फराटे (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे.), सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कानगाव येथील भीमा नदीपात्रात वन आणि महसुली विभागाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वाळू उपसा सुरू होता.
वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि महसूल विभागाचे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वाळू लिलाव घेतला आहे असे सांगत प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करून फायबर बोटी नदीच्या पात्रात उतरून वाळू उपसा करून ट्रक आणि ट्रॅक्टर च्या साह्याने परस्पर वाळू वाहतूक व विक्री सुरू होती. बेकायदा वाळू उपसावर महसूल आणि वन विभाग एकमेकांच्या हद्दीत असल्याचा कांगावा करत ह्या प्रकारकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते.
या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी, पुर्नवसन तथा पथक प्रमुख जिल्हा स्तरीय गौण खनिज पथकाच्या नायब तहसीलदार ज्योती देवरे आणि दौंड तहसीलदार यांच्याकडे तक्रारी गेल्याने अखेर तहसीलदार अरुण शेलार यांनी मंगळवारी (दि १२ ) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकासह भीमा नदीच्या पात्रात धाड टाकली.
याप्रसंगी दत्त मंदीराच्या पाठीमागे आणि स्मशानभूमी जवळ भीमा नदीच्या पात्रात दोन फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून त्याची ट्रक आणि ट्रॉलीच्या साह्याने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारवाईसाठी पथक आल्याने अंधाराचा फायदा घेऊन वाळु लिलाव धारक सुयेश ट्रान्सपोर्ट तर्फे श्री. सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या तर्फे हजर असलेले) संदीप संभाजी फराटे (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे) तसेच त्याचे इतर साथीदार तेथुन पळून गेले.
तहसीलदारांनी एक ट्रक व पाच ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या तसेच भिमा नदीपात्रामध्ये वाळु उत्खन्न करणा-या दोन सेक्शन बोटी, अंदाजे ७ ब्रास वाळु असा एकूण ११ लाख १० हजार किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी तहसीलदार अरुण शेलार यांच्या आदेशानुसार तलाठी शंकर दिवेकर यांनी फिर्याद दिल्याने वाळु लिलाव धारक सुयेश ट्रान्सपोर्ट तर्फे श्री. सुयेश धनसिंग भोईटे (रा. सांगवी दुमाळा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर ) व संदीप संभाजी फराटे (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे.)यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भीमा नदीच्या पात्रात वाळू उपसा व लिलाव रद्द करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. दौंड वनविभागाने ही वनविभागाच्या हद्दीत वाळू उत्खनन करण्यात येऊ नये असा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.











