अभिनेते किरण माने हे सामाजिक चळवळीत किती अग्रेसर आहे त्याची सर्वांना कल्पना आहेच, परंतु कधीकधी इतके विस्फोटकही लिहितात आणि कधीकधी मनाचा एवढा ठाव घेतात की बस त्यांच्यासारखा लेखक तेच! किरण माने यांचे लिहिणं हे अगदी गावरान भाषेतलं.. परंतु सर्वांना समजणार असंच असतं. काल संताजी जगणे जगनाडे महाराज यांची जयंती झाली. त्या निमित्ताने त्यांनी लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे!
किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे, संत जगनाडे महाराजांची जयंती काल साजरी झाली. माझ्या तुकोबाच्या विचारांना अमर करणार्या या महान संताचे किती आणि कसे आभार मानावे? आजबी दिंडीतले वारकरी नाचत-नाचत म्हणतात, “संताजी तेली बहु प्रेमळ । अभंग लिहित बसे जवळ ।। धन्य त्याचे सबळ । सांगे सर्वकाळ तुक्याचा ।”
…आपल्या गांवात आलेल्या तुकोबारायाचं भन्नाट किर्तन ऐकून त्या रात्री संतू तेलीला झोप लागली नाय भावांनो ! झपाटल्यागत झालं. संतू उर्फ संताजी जगनाडेच्या वडलांचा तेलाचा घाणा होता. लिहीतावाचता येण्याइतकं शिक्षण झालंवतं. त्यानं रात्री तुकोबांनी म्हन्लेले अभंग लिहुन काढले. मग तर जीव लैच कासावीस व्हायला लागला. सरळ दुसर्या दिवशी तुकोबांचे पाय धरले आणि मला तुमच्यात सामील करून घ्या म्हणून हट्ट धरला !
तुकोबारायांनी लै समजावलं की ‘ही अभंग, भजनातनं समाजसुधारणेची वाट बिकट हाय गड्या. तुझं घर संसार बरं चाललंय, पैसाअडका मजबूत हाय, कशाला ह्यात पडतोस…’ पण संतूला लहानपणीपास्नं गोरगरीबांविषयी कळवळा ! विठूरायाची भक्ती तर वडलांकडनं रक्तातच भिनलेली. त्यामुळंच तर त्याला ‘माझीया जातीचा’ कुणी गुरू भेटल्याचा आनंद झालावता. शेवटी लैच हट्ट केल्यावर तुकोबांनी त्याला आपल्या चौदा टाळकर्यांच्यात सामील करून घेतले.
किर्तनातले तुकोबांचे काही अभंग संतूनं वहीत उतरवून काढायला सुरूवात केली. बरेच अभंग तोंडपाठबी होते. नंतरच्या काळात जवा रामेश्वर भट वगैरे वर्चस्ववादी गॅंगनं तुकोबारायाची गाथा नदीत बुडवायची शिक्षा दिली. त्यानंतर ‘तरीबी ती गाथा तरली’ असं म्हणायची रीत सुरू झाली. पण ती गाथा, तुकोबांचे अनमोल अभंग तारण्याचं लै लै लै मोठ्ठं श्रेय संतूला जातं… त्यामुळंच तर संतू तेलीचं परीवर्तन हळूहळू ‘संत जगनाडे महाराज’मध्ये झालं !
तुकोबांना छळणार्या मंबाजी भटाच्या टोळक्याला त्यांचे अभंग पूर्ण नष्ट करायचे होते. बहुजनांना ज्ञान देणारी, मार्ग दाखवणारी, सत्य सांगून सावध करणारी, कर्मकांडांपास्नं-अंधश्रद्धांपास्नं दूर ठेवणारी, हिताच्या गोष्टी सांगणारी गाथा पुढच्या पिढीपर्यन्त पोहोचू द्यायची नव्हती. त्यांना माहिती होतं त्यांच्या चौदा टाळकर्यांना ही गाथा तोंडपाठ आहे.
त्यातल्या त्यात साक्षर आणि बुद्धिमान असलेल्या जगनाडे महाराजांवर त्यांचा लै डोळा होता. त्या कपटी, कारस्थानी लोकांच्या हाताला हे लिहून ठेवलेले अभंग लागू नयेत म्हणून जगनाडे महाराजांनी सगळे कागद सुदुंबरे या त्यांच्या गांवी लपवून ठेवले होते. तुकोबाराया गेल्यानंतर ही गाथा जगनाडे महाराजांनी परत लिहून काढली आणि बहुजनांच्या पिढ्यान्पिढ्यांचा उद्धार केला…गाथा ‘तरली’ ती अशी !











