नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
वेदनाशामक म्हणून अलीकडे सर्रास वापरले जात असलेली मेफ्टल ही गोळी तुम्ही सतत खात असाल, तर सावधान! आयपीसी अर्थात भारतीय फार्माकोपी कमीशनने मेफ्टल या गोळीसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या गोळीमध्ये असलेले नेफिनॉमिक ऍसिड कालांतराने मोठ्या आजारांना निमंत्रण देऊ शकते असा इशारा दिला आहे.
लहान मुलांचा संधिवात, लहान मुलींची मासिक पाळीतील वेदना, डोकेदुखी, अंगदुखी, दातदुखी अशा विविध आजारांसाठी हे औषध सर्रास अलीकडे वापरले जाते आणि घरांमध्ये हे औषध ठेवले जाते. डॉक्टर देखील या औषधाची शिफारस करतात.
या गोळ्यांच्या सततच्या सेवनामुळे संधिवात, मासिक पाळीतल्या वेदना काही काळापुरत्या थांबू शकतील, परंतु याची एलर्जी झाली तर ताप येण्यापासून ते ड्रेस नावाच्या आजारापर्यंत याची मजल जाऊ शकते. याची कालांतराने एलर्जी होऊ शकते असाही इशारा आयपीसी ने दिला आहे. या औषधामुळे कोणताही त्रास झाला तर केंद्र शासनाने दिलेल्या http://www.ipc.gov.in या संकेतस्थळावर आपली प्रतिक्रिया नोंदवावी असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.











