दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीला हानिकारक हा पाऊस असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
मागील तीन दिवसांपासून दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, मलठण , देऊळगाव राजे तसेच दौंड शहरात अवकाळी पाऊस पडला. सध्या दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असून अनेक ठिकाणी रिमझिम तर अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
दरम्यान गुरुवारी (दि ३०) रात्री दौंड तालुक्यात 39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देऊळगाव राजे भागात १५ मिलिमीटर, रावणगाव १५ मिलीमीटर तर दौंड ११ मिलीमीटर असा एकूण ३९ मिलिमीटर सरासरी ४.८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद शासकीय दप्तरी झाली आहे.
दरम्यान, तालुक्यात साखर कारखाने सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या उसाची ऊसतोड सुरू आहे. परंतु शेत पिकात पाणी साचून चिखल झाल्याने अंतर्गत रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे ऊस वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे बाजार दर वाढल्याने वखारीतून कांदा बाहेर काढला, पण पावसाच्या वातावरणामुळे त्यांना पुन्हा कांदा वखारीत टाकण्यासाठी कसरत करावी लागली. पावसाळ्यात हुलकावणी दिलेल्या पावसाने हिवाळ्यात हजेरी लावल्याने हा पाऊस शेतीसाठी नुकसानकारक ठरणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.











