बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील रेड बर्ड या विमान प्रशिक्षण संस्थेची दोन विमाने दोन आठवड्याच्या कालावधीत दोन वेळा कोसळली. यामुळे बारामती परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी या विमान संस्थेचा परवाना निलंबित करण्यात आला, मात्र त्याची चौकशी करण्यासाठी बारामतीत आलेल्या विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याने या संस्थेच्या नऊ जणांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा रेड बर्ड या विमान प्रशिक्षण संस्थेच्या कॅप्टन शक्ती सिंग याच्यासह नऊ जणांविरोधात दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद विमान पतन प्राधिकरणाचे अपघात तपास पथकाचे सहाय्यक संचालक आनंदन पोनूस्वामी यांनी दिली.
बारामतीतील विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच कटफळ परिसरात विमान कंपनीची दोन विमाने काही दिवसांच्या अंतराने कोसळली होती. यामुळे या विमान संस्थेचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली होती. दरम्यान या दोन्ही घटनांचा तपास करण्यासाठी आनंदन पोनुस्वामी व कनिमोझी व्यंंधन हे दोन संचालक बारामतीत आले होते. मात्र त्यांना तपासात सहकार्य करण्याऐवजी रेड बर्ड कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकावले व शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे त्यांनी वरील फिर्याद तालुका पोलिसांकडे दिली.











