बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी देहूत संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात भेट दिल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या शैलीत अत्यंत टोकदार टिका करत शास्त्रीच्या भोंदूपणावर आसूड ओढला आहे. किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट जशीच्या तशी!
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू ।।
अंगा लावूनिया राख । डोळे झाकूनी करिती पाप ।
दावुनी वैराग्याची कळा ।भोगी विषयांचा सोहळा ।
तुका म्हणे सांगो किती । जळो तयांची संगती ।
तुझी हयात गेली की रं बाबा, आम्हाला हे सांगण्यात ! वासनेची बुंथी । तेथे कैची ब्रह्मस्थिति ।। असं बेधडकपणे सांगणार्या तुला त्या काळात काय त्रासातून जावं लागलं आसंल, हे आजच्या विषारी भवतालात परत एकदा समजून घेन्याचा प्रयत्न करतोय आम्ही, तुकोबा!
तुकोबा…येडा होतास का रं तू? आम्ही सगळे दगड आहोत, हे कळत नव्हतं का तुला? पोटतिडकीनं वरडून- वरडून सांगीतलंस आम्हाला तू… आज, साडेतीनशे वर्षांनंतरबी काय फरक पडला आमच्यात??
मस्त सावकार होतास गड्या ! आयुष्यभर सुखाने जगला असतास. काय पडलीवती तुला आमच्या जगन्याची? शेवटी तू निंदलेल्या भोंदूंचेच भक्त होण्यातच आम्ही आयुष्य बरबाद करणार आहोत, हे तुला कळत नव्हतं का? का उगं पंगा घेतलास अशा कर्मठांशी, बहुजनांना भिकेला लावणार्या बुवाबाबांशी ?
तुमचे येर वित्त धन । तें मज मृत्तीकेसमान असं म्हणणारे तुझ्यासारखे ‘कफल्लक’ गरीबडे बुवा आवडत नाहीत, गड्या आम्हाला. नाक कापुनि लावी सोने । कोण अलंकार लेणे अशी तू ज्यांची हेटाळणी केलीस, तेच फाईव्ह स्टार – लॅव्हिश बाबा-बुवा-बापू आम्हाला उरावर घ्यायचे असत्यात ! एवढा बुद्धिमान लगा तू, तुला कसं रं कळलं नाय हे?
बुवाबाजी करणार्या पाखंड्यांना कलियुगी कवित्व करिती पाषांड । कुशळ हे ‘भांड’ बहु झाले ।। द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी । मुखे बडबडी कोरडेची । असे सडेतोड ऐकवणार्या तुला मारहान झाली लगा ! गाथेत त्या मारहानीचं वर्णन लिहून ठेवलंययस तू, पाहोनिया अंत क्षमा । अंगी काठीवरी मारविले ।। शिव्या गाळी नीत नाही । बहु फार विटंबिले । हे वाचताना अंगावर काटा येतो तुका ! आज तुला मारनार्यांच्या पिलावळीसाठी तुझ्या गांवात आम्ही पायघड्या अंथरल्यात. येडा होतास माझ्या बापा. का केलास ह्यो आटापिटा कुनास ठावूक !











