राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे कुसेगाव येथे दहन करण्यात आले तर कानगाव येथे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करीत भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे पार पडलेल्या आरक्षण बचाव एल्गार सभेत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत असल्याचा आरोप करीत दौंड तालुक्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र रविवारी (दि १९) पहायला मिळाले.
तालुक्यातील कुसेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन करण्यात आले. यावेळी भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कानगाव येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यासमोर मंत्री छगन भुजबळ आणि दौंड तालुक्याचे ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ यांनी मराठा समाजावर टीका करीत खालच्या पातळीवर भाषा वापरीत बदनामी केल्याचा आरोप करीत जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदवला.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ व पांडुरंग मेरगळ यांच्यावर मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी आणि मराठा समाजाची अपशब्द वापरुन बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यवत पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.











