बारामती : महान्यूज लाईव्ह
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश व्हावा यासाठी चौंडीनंतर बारामतीत धनगर समाजाचे चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा सातवा दिवस होता मात्र आपले उपोषण सोडवण्यासाठी एक तर मुख्यमंत्र्यांनी इथं बारामतीत यावं किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी चंद्रकांत वाघमोडे यांनी केली आहे.
बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर गेले सात दिवस वाघमोडे हे उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि या आंदोलनाची व्याप्ती सांगितली. त्यानंतर काल देखील सुप्रिया सुळे यांनी धनगर आंदोलकांची भेट घेतली व यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
त्यानंतर आज बारामतीत स्वतः जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल दोघेही आले, परंतु चंद्रकांत वाघमोडे मात्र त्यांच्या मागणीवर थांब राहिले. दोघांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे येत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतला.
चौंडीतील उपोषण आंदोलनानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. तसेच 50 दिवसात या संदर्भात निर्णय घेऊ असेही आश्वासन दिले. 50 दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र सरकारने या काळात काय केले याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना गेल्या पंधरा दिवसात आपण काय केले हे विचारायचे आहे. त्याचे उत्तर फक्त मुख्यमंत्री देऊ शकतात. त्यामुळे एक तर मुख्यमंत्र्यांनी इथे यावं किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी यावे अशी मागणी वाघमोडे यांनी केली.











