बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील वंजारवाडी गावच्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावाकडे गेलेल्या परप्रांतीय मजुरांच्या नावावर अन्य लोकांना उभे करून त्यांचे मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर असलेले मतदान अधिकारी पिंटू दादाराम सावंत यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बारामतीतील पेन्सिल चौक येथे राहणारे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील प्रेमसिंह सालमजी मालवी व त्याची पत्नी जमना प्रेमसिंह मालवी आणि त्यांचा ठेकेदार शैलेश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पिंटू दादाराम सावंत यांनी फिर्याद दिली होती. पिंटू सावंत हे चौधरवस्ती प्राथमिक शाळेमध्ये मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. पिंटू सावंत हे काम करत असताना दोघेजण या ठिकाणी आले आणि त्यांनी आमचे मतदान कुठे आहे असे विचारले. त्यावरून आधार कार्ड तपासल्यानंतर त्यावर गुरुचरण भागवत बारीक व बसंती गुरुचरण बारीक (दोघेही राहणार मालुसरे वस्ती वंजारवाडी) अशी नावे आधार कार्डवर दिसली.
मात्र या नावाच्या व्यक्तींना सावंत ओळखत होते, त्यामुळे समोर असलेले पुरुष व महिला अनोळखी असल्याने संशय आला त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यावेळी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा कर्मचारी बाळू रामचंद्र सोनवणे यांना तसेच बापूसाहेब बनकर या पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार पिंटू सावंत यांनी सांगितला व गुरुचरण बारीक व बसंती बारीक यांना आपण ओळखत असल्याचे व आता समोर असलेले पुरुष व महिला ते नसल्याचे सांगितले.
त्यावर बनकर यांनी लागलीच हा प्रकार त्यांच्या वरिष्ठांना फोनवरून कळवला आणि या ठिकाणी पोलीस पथक आले. त्यांची चौकशी केली असता, त्यातील एक जण हा प्रेमसिंह सालमजी मालवी व महिलाही जमना प्रेमसिंह मालवी (दोघेही राहणार धामणदार, सिहोर, मध्य प्रदेश) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ठेकेदार शैलेश यांनी आम्हाला हे आधार कार्ड दिल्याचे सांगितले व मतदान करण्यासाठी पाठवले, त्यावरून ते बनावट मतदान करण्यासाठी इथे आल्याची खात्री पटली आणि त्यावरून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.











