मुंबई : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली. अजित पवार यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, यावर्षीची पवार कुटुंबाची दिवाळी कशी असणार? त्यावेळी आमची कुटुंबाची दिवाळी यंदाही एकत्रच असेल असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते, परंतु आता अजित पवार यांच्या प्रकृतीची नवीन अपडेट समोर आली असून, या संदर्भात स्वतः अजितदादांनी खुलासा केला आहे.
अजित पवार यांना डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा, तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे सर्वांपासून नाईलाजाने अजित पवार दिवाळीच्या काळात दूर राहणार आहेत असेच आता स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात स्वतः अजित पवार यांनीच माहिती दिली असून या संदर्भातील पोस्ट अजित दादांनी केली आहे त्यामध्ये ते म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला, तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा, तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही.
परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.
अजित दादांनी स्वतः स्पष्टीकरण दिले असल्यामुळे यावर्षी दिवाळीच्या काळात बारामतीत अजितदादा पाडव्याचा शुभेच्छा देण्यास व घेण्यास उपस्थित असतील ही शक्यता धूसर झाली आहे.











