सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कोणाचे पॅनल आले याच्यापेक्षाही आता गावागावात निवडणुकीच्या काळात धरलेली राजकीय खुन्नस वैयक्तिक दुश्मनीवर येऊन पोहोचली आहे. बारामती तालुक्यातील मेडद आणि सायंबाचीवाडी येथील घटनेनंतर इंदापूर तालुक्यातील काझड गावांमध्ये काल रात्री निवडणुकीत पडल्याच्या रागातून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरून काझड मधील राहुल चांगदेव नरूटे व समीर मल्हारी नरूटे याच्या विरोधात पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या व दहशत माजवल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
काझड मध्ये काल ग्रामपंचायत निवडणूक होऊन निकाल जाहीर झाला यामध्ये सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने गावात दहशत वाजवण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत हवेत गोळीबार करण्याची घटना घडली.
इंदापूर तालुक्यातील काझड मध्ये काझड-अकोले रोडवर अकोले चौकात ही घटना घडली. घटना समजताच वालचंदनगर पोलिस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. चौकशीअंती वालचंदनगर पोलीसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.











