राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यात दहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी ( दि ५) मतदान आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे.
गावगाड्यातील गटातटात, भावकी रावकीत सध्या लोकशाहीचे राजकीय आखाडा सुरू आहे. दौंड तालुक्यातील अकरा पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित दहा तर बारामती तालुक्यातील ३२ पैकी ३१ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी गावगाड्यात चांगलीच तापली. बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्र्यांचं गाव असलेल्या काटेवाडीत तर इंदापूर तालुक्यातील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गाव असलेल्या बावड्यातही निवडणूक चांगलीच रंगली आहे.
सरपंच निवड ही जनतेतून असल्याने सरपंच पदासाठी चांगलीच चुरस झाली. काही ठिकाणी मात्र गटातटातील मतभेद विसरून दोन्ही गट एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र एकंदरीत गावगाड्यातील राजकीय वातावरण गटातटाच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघाले.
काही ठिकाणी सरपंच पदासाठी अनेक उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत, त्यामुळे कोणाला मतदान करायचे याचा पेच मतदारांना पडला. प्रस्थापित राजकीय गाव पुढाऱ्यांना अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी घेरले. तर अनेक वर्षे गावगाड्यात असूनही आपल्या पत्नीला गावची कारभारीण करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पतीराजाची चांगलीच दमछाक होत असल्याचे पाहायला मिळाले.











