दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : बावधन (ता.वाई) येथील अविनाश पिसाळला अटक केल्यानंतर ६ गावठी कट्टे व पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले होते. त्यानंतर पोलीस कोठडीत त्याच्याकडील चौकशीनंतर त्याच्या गोठ्यावर छापा टाकला असता, तिथे देखील एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस पोलिसांना ताब्यात मिळाले.
अविनाश पिसाळ याला ३० ऑक्टोबर रोजी अटक करुन वाईच्या न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्या दोन दिवसाच्या पोलिस कोठडीदरम्यान वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, फौजदार सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, अजित जाधव, हेमंत शिंदे, राहुल भोईर, प्रेमजीत शिर्के, नितीन कदम, गोरख दाभाडे यांच्या पथकाने पिसाळ याच्या गुरांच्या गोठ्याची तपासणी केली.
तेथे पिसाळ याने लपवून ठेवलेले एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस पोलिस पथकाच्या ताब्यात दिले. दरम्यान १ नोव्हेंबर रोजी आरोपीला न्यायालयाने दिलेली दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यास पुन्हा पोलिस कोठडी देण्याची न्यायालयाकडे मागणी केल्याने न्यायालयाने पिसाळ यास एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, राहुल भोईर, अजित जाधव, हेमंत शिंदे, प्रेमजीत शिर्के, नितीन कदम, गोरखनाथ दाभाडे यांच्या पथकाचे पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले. दोन दिवसापूर्वी याच आरोपीकडून तीन गावठी पिस्तूल, दोन गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसांच्या रिकाम्या पुंगळया, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे वाघांचे नखे असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.










