मुंबई : महान्यूज लाईव्ह
आपला उदो उदो करेल तो भक्त; नाहीतर देशद्रोही! अशा प्रकारची राजकीय संस्कृती जी या देशात सुरू झालेली आहे, त्याचा फटका पत्रकारितेला बसतोच आहे. अनेक बड्या पत्रकारांना वृत्तवाहिन्या सोडावा लागल्या आहेत हा इतिहास ताजा असतानाच, आता तर महाराष्ट्रातील एक वृत्तवाहिनी थेट कायमची बंद होणार आहे. दोन दिवसात ही वाहिनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थात पत्रकारितेतील चर्चेनुसार ही वाहिनी बंद करण्याचे आदेश वरूनच आहेत परंतु याला आर्थिक कारण देऊन गुळमळीतपणा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच ही वृत्तवाहिनी महाराष्ट्रात सुरू झाली होती. देशातील राष्ट्रीय वृत्तवाहिनीचा एक भाग असलेली प्रादेशिक वृत्तवाहिनी अल्पावधीतच राजकारणात घुसली आणि त्याचा तिटकारा काही जणांना जाणवला. मुंबईसंदर्भात केल्या जाणाऱ्या वृत्तांकनामुळे काही जणांचे पित्त खवळले आणि वृत्तवाहिनीविषयी कडवी टीका त्यांचे समर्थक सोशल मीडियात करू लागले.
त्यातच एका राजकीय नेत्याचे अश्लील चाळे ज्या वृत्तवाहिनीने राज्यात दाखवण्याचे धाडस केले, त्या वृत्त वाहिनीला काही तासांची बंदी घातल्यानंतर आता अघोषित आदेशानुसार एक चॅनेलच बंद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. येत्या एक-दोन दिवसात हे चॅनल कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि महाराष्ट्रातील गाशा गुंडाळणार आहे. या चॅनेलच्या दिल्ली आणि मुंबईतील पत्रकारांना देखील तसेच कर्मचाऱ्यांना देखील इतर ठिकाणी नोकऱ्या शोधण्याचे संकेत दिले गेले आहेत.











