शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, हातनोली – रायगड. (मो.9822 650 280)
प्रति, आदरणीय मनोज जरांगे -पाटील, आंतरवाली सराटी, जालना.
आज महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांच्या घरामध्ये जेवणाचं ताट समोर आलं की तोंडातला घास घशाखाली उतरत नाही, कारण डोळ्यासमोर उभी राहते ती आंतरवाली सराटी मधील मनोज जरांगे पाटलांची आकृती, त्यांची शरीरयष्टी, पांघरूण अंगावर घेऊन तक्क्यावर निपचित पडलेला चोळामोळा झालेला देह, माईक वर बोलताना थरथरणारा हात, बसलेला आवाज आणि डोळ्यात दिसणारी मराठा आरक्षणाची काळजी.
आत्ताच्या घडीला मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नापेक्षाही मनोज जरांगे पाटलांच्या जीवनाची सुरक्षितता लाखो मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सिर सलामत तो पगडी पचास! एक मनोज जरांगे पाटील असतील, तर मराठ्यांच्या आरक्षणाचाच प्रश्न काय, पण भविष्यात मराठ्यांच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची आशा जिवंत राहील. खूप काळानंतर मराठ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढणारे नेतृत्व भेटतंय असं आता कुठे वाटत चाललंय. त्यामुळे या नेतृत्वाची जपणूक महत्त्वाची आहे.
चौरी चौरा येथील घटना घडल्यानंतर महात्मा गांधींनी ही काही कालावधीसाठी आंदोलन मागे घेतलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे की लढायचं ते मरण्यासाठी नाही, तर लढायचं ते जिंकण्यासाठीच. त्यासाठी वेळ पडली तर गनिमी काव्याने दोन पावलं मागे यायची ती पुन्हा एकदा उसळून झेप घेण्यासाठी.
तिकडे आंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं, तर मराठ्यांच्या घराघरातील मनोज जरांगे कोलमडून पडेल. तो सैरभैर होईल. त्याची आशा संपेल, तो निराशेच्या गर्तेत जाईल, अविचाराची वाट धरेल, चुकीच्या मार्गाने पेटून उठेल. मग त्या पेटलेल्या घराघरातल्या मनोज जरांगे पाटलाला कोणालाच थांबवता येणार नाही. मग काय होईल कल्पनाही करता येणार नाही.
आदरणीय मनोज जरांगे पाटील तुमचा जीव आता एकट्याचा जीव राहिला नाही. तुमचा जीव आता महाराष्ट्राचा जीव झालाय. तुमच्या जिवात महाराष्ट्राचा जीव अडकलाय. महाराष्ट्राच्या शांत जगण्यासाठी तुमचं जगणं महत्त्वाचं आहे. हात जोडून विनंती आहे, काळजी घ्या. फक्त मराठ्यांनाच नव्हे, जीवनात प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही हवे आहात…. मराठ्यांना जिंकायचं आहे पण ते तुमच्या सोबतच! जय शिवराय!











