बारामती : महान्यूज लाईव्ह
एकमेकांच्या सोबतीनं अख्खं आयुष्य काढण्याच्या आणाभाका म्हणे सप्तपदीच्या वेळीच घेतल्या जातात…आणि साता जन्माच्या गाठी वरतीच बांधलेल्या असतात.. गाठी बांधल्या गेल्या..पण आयुष्यही एकमेकांबरोबरच संपेल असं त्या दोघांच्याही मनात कधी आलं नाही..कोरोनानं ती दृष्ट वेळ आणली…रात्रीच्या वेळी पती आणि पहाटे पत्नीने जग सोडण्याची ही घटना जळोचीच्या स्मशानभूमीत आणि दवाखान्यांतही अनेकांना अस्वस्थ करून गेली..
कोरोनाने घरेच्या घरे उध्वस्त केली…कोणाच्या घरातील कर्ता पुरूष गेला..कोणाच्या घरातील सख्खे भाऊ गेले..कोठे बापलेक गेले.. तर कोठे नवरा बायको..! वैरीही चिंतणार नाही अशी प्रचिती बारामती व इंदापूर तालुक्यातील लोकांना गेल्या चार महिन्यात आली आहे. अजून कितीतरी वर्षे हसतखेळत ज्यांनी काढली असती, ते लोक पाहता, पाहता..अगदी सकाळी हसत खेळत रुग्णवाहिकेतून गेल्यानंतर संध्याकाळी थेट स्मशानात पोचल्याच्या घटना घडल्या.
काल बारामती तालुक्यातील पणदरे परिसरातील ही घटना मात्र हजारो दांपत्यांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली..आणि कोरोनाची भीती आणखी गडद करून गेली. पणदरे येथील हे शेतमजूर कुटुंब..तसं कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेले..मजूरी करून घर चालविणारे, दोन मुलांचा संसार पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या दांपत्याच्या आयुष्यात ८ सप्टेंबरची रात्र काळरात्र बनून आली. पतीला धाप लागू लागल्याने डॉक्टरांकडे केल्यानंतर कोरोनाची चाचणी करायला लावली.
चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा निरोप आला आणि पती बारामतीतील रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला. एका मुलालाही कोरोना झाला. याचा पत्नीला मोठा धक्का बसला. दररोज कानावर पडणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांनी ही माऊली हबकून गेली. त्यातच पाठोपाठ दुसऱ्या दिवशीच पत्नीला देखील त्रास सुरू झाला. पती आणि एक मुलगा दवाखान्यात दाखल असतानाच आईला घेऊन धाकटा मुलगा दवाखान्यांमध्ये फिरू लागला. एका खासगी दवाखान्याने आईची प्रकृती पाहताच व्हेंटीलेटर लागणार आहे, तेव्हा ३० हजार रुपये लागलीच व २० हजार रुपये दररोज असा आकडा सांगितला. आकडा ऐकून मुलगा हबकला, मात्र ते पैसे देण्याचे त्याने कबूल केले.
फक्त तो एकच वाक्य बोलून गेला, आमची परिस्थिती तशी बेताचीच आहे, जास्त खर्च होणार नाही असं तेवढं बघा.. खरंतर ही विनंती होती, मात्र दवाखान्याच्या हुशार एजंटांनी कदाचित तेच वाक्य बरोबर हेरले असावे, कारण त्याला गोड बोलून त्या दवाखान्याने त्या मायलेकरांना सरकारी दवाखान्याचा रस्ता दाखवला. त्याच्या माऊलीला शेवटच्या काळात शेवटच्या क्षणापर्यंत व्हेंटीलेटर मिळालाच नाही, तोपर्यंत तिकडे वडीलांच्या दुसऱ्या चाचणीत कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला होता आणि तोपर्यंत वडीलांचा प्रवास अखेरच्या मार्गाने सुरू होता.. इकडे पतीच्या आजारपणाचा धसका घेत त्या माऊलीने आपला प्राण काल पहाटे सोडला. मात्र तत्पूर्वीच रात्री पतीने जग सोडले होते…!
मुलगा जड अंतःकरणाने आपल्या आईच्या जवळ शेवटच्या क्षणी थांबला होता, तेव्हा त्याच्या मनात चाललेली प्रचंड खदखद दवाखान्याच्या त्या निशब्द भिंतीने फक्त ऐकली असेल.. बाकी जगाच्या कानाकोपऱ्यात त्या मृत्यूची ना वार्ता कुणी ऐकली..ना त्या लेकराच्या मनाचा ठाहो..ना कर्मकांड, ना अखेरचे विधी…!











