दौंड : महान्यूज लाईव्ह
संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण गावागावात पोहोचले असून राजकीय पक्षांच्या नेत्यांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका संजय राऊत यांना देखील बसला. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
संजय राऊत हे दौंड शहरात थांबले होते. याची माहिती सकल मराठा समाजाच्या तरुणांनी घेऊन ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेल समोर जाऊन त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात चले जाव अशी घोषणाबाजी केली.
दरम्यान आज दौंड मध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी पुन्हा एकदा दौंड मधील भीमा पाटील साखर कारखाना आणि राहुल कुल यांच्यावर टीका करताना कारखान्यामधील 500 कोटींच्या मनी लॉन्ड्रींगचा विषय पुन्हा अधिक छेडला. भाजपने जणू वॉशिंग मशीन हातात घेतली असून त्यामध्ये ते भ्रष्टाचारी लोकांना क्लीन करतात.
फोडाफोडी करून ज्यांना सत्तेत घेतले त्या प्रत्येक पक्षाचे किमान दहा ते बारा मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यात गद्दार शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे भ्रष्टाचारी मंत्री आहेत, भाजपमध्ये देखील भ्रष्टाचारी आहेत. एवढेच नाही, तर अजितदादा गटाचे ही भ्रष्टाचारी घेतलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवस आधी सिंचन घोटाळ्याचे नाव घेतात आणि त्यानंतर लागलीच राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी होतो. याला काय म्हणायचे?
जोपर्यंत राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत आणि देशांमध्ये ईडीसीबीआय सारखी खेळणी सरकारने करून ठेवलेली आहेत, तोपर्यंत याला संरक्षण मिळत राहील, मात्र 2024 नंतर या राज्यात आणि देशात शंभर टक्के बदल होणार आहे. त्यावेळी जसे आज विरोधी पक्षात लोकांना तुरुंगात टाकले जाते, खोट्या प्रकरणांमध्ये तुरुंगात डांबले जाते, परंतु यांची तर प्रकरणं खरी आहेत. यांच्या प्रकरणाची चौकशी होणार म्हणजे होणार!











