विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले असून,नेत्यांच्या गावबंदीचे लोण अनेक जिल्ह्यांत पसरले आहे. त्यातून सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता.
या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये या उद्देशाने घेण्यात आलेली कारखाना प्रशासन,मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिस प्रशासनाची आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली होती. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमास अजित पवार यांना जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली होती.
त्यानंतर आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले होते. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल साडेतीनशे पोलीस तर राज्य राखीव पोलीस दलाच्या देखील दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
दरम्यान आज सकाळपासूनच माळेगाव साखर कारखान्याच्या समोरील शेतकरी पुतळ्याजवळ मराठा आंदोलक जमा होण्यास सुरुवात झाली. दहा-साडेदहा वाजता त्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेल्यानंतर येथील परिसर आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
तर दुसरीकडे मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर अजित पवारांनी बारामतील दौरा रद्द केला. मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा आहे. शेतकऱ्यांच्या हस्ते मोळीपूजन करा असा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांना दिला. त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळीपूजन शेतकरी सभासद व महिलांच्या हस्ते करण्यात आले.











